UPCOMING EVENTS


Upcoming Events (Lectures on):

  • HISTORY WEEK FEBRUARY 2012


  • History Week 2012
  •   lecturers:30th Jan-श्री.कुमार केतकर_Pandit Neharu, 31st Jan श्री.सुरेश द्वादशीवार_Mahatma Gandhi,
  • 1st Feb श्री.राजू परुळेकर_Dr. Babasaheb Ambedkar,
  • 2nd Feb_श्री.अजित अभ्यंकर_Marx , 3rd Feb_श्री.विश्वंभर चौधरी _RSS

Monday, September 6, 2010

कवी भूषण

साहि तनै सरजा कि कीरती सों ।
चारों और चाँदनी वितान छिति छोर छाइयतु है ।
भूषन भनत ऐसो भूप भौंसिला है ।
जाको द्वार भिच्छुकन सो सदाई भाइयतु है ।
माहादानी सिवाजी खुमान या जहान ।
पर दान के प्रमान जाके यों गनाइयतु है ।
रजत की हौस किए हेम पाइयतु जासो ।
हयन की हौस किए हाथी पाइयतु है ॥

अर्थ :-

शहाजी पुत्र शिवरायांच्या कीर्तिरूप चांदणीचा मंडप पृथ्वीच्या चहूंकडील टोकापर्यंत पसरला आहे. भूषण म्हणतो, हे भोसलेराज असे आहेत की, भिक्षुकांना नेहमी त्यांच्या द्वाराशी पडून रहावेसे वाटते. या भूतलावर शिवाजी महाराज महान महान दाता असून त्यांच्या दानाचे प्रमाण यावरूनही समजून येते ; की रूप्याची इच्छा केली असता सोने मिळते व घोड्याची इच्छा केली असता महाराजांकडून हत्ती मिळतो.
सिवाजी न हो तो.....


कुंभ कन्न असुर अवतारी अवरंगजेब कीन्ही ।
कत्ल मथुरा दोहाई फेरि रब की ।
खोदि डारे देवी देव सहर महल्ला बाँके ।
लाखन तुरूक कीन्हे छूटि गई तब की ।
भूषन भनत भाग्यो कासीपति विश्वनाथ ।
और कौन गिनती में भूली गति भब की ।
चारो वर्ण धर्म छोडि कलमा निवाज पढि ।
सिवाजी न हो तो सुनति होत सब की ॥
अर्थ :-
भूषण म्हणतो, कुंभकर्ण राक्षसाचा अवतार जो औरंगजेब - त्याने मथुरेची कत्तल करून सर्व शहरात "रब"ची द्वाही फिरवली (मुसलमानी चालविली). शहरातील गल्लोगल्लीतून असलेल्या उत्तम उत्तम देवता खोदून खणून काढल्या. लाखो हिंदुंना बळाने मुसलमान केले, इतकेच काय, प्रत्यक्ष काशी विश्वनाथ भयभीत होउन पळाले, महादेवाची अशी त्रेधा उडाली तेथे इतरांची काय कथा ? अशा भयाण वेळी जर शिवराय नसते तर चारही वर्णांना आपापले धर्म सोडून नमाज पढावा लागला असता व सर्व हिंदुंची सुंता झाली असती.
इते गुन एक सिवा सरजामै


सुन्दरता गुरुता प्रभुता भनि भूषन होत है आदर जामै ।
सज्जनता औ दयालुता दीनता कोमलता झलकै परजामै ।
दान कृपानहु को करीबो करीबो अभै दीनन को बर जामै ।
साहन सो रन टेक विवेक इते गुन एक सिवा सरजामै !!

अर्थ -

भूषण म्हणतो सौंदर्य, गुरुत्व व प्रभुत्व हे गुण यांच्या ठिकाणी वसत असल्यामुळे आदरास पात्र झालेले आहेत; तसेच यांच्या ठिकाणी प्रजेविषयी सौजन्य, दयालुता, कोमलता दिसून येते; शत्रुंना तरवारीचेच दान व दीनांना अभय वर देण्याचे त्यांच्या अंगी सामर्थ्य आहे. बादशहांशी पण लावून युद्ध करणे आणि कोणतेही कार्य विचारपूर्वक करणे हे इतके गुण एका सर्जा (सिंहासमान शूर अशा) शिवरायांच्या ठिकाणी आहेत.
हिन्दुपति सेवाने


मन कवी भूषन को सिव की भगति जीत्यो
सिव की भगति जीत्यो साधु जन सेवाने ।
साधु जन जीते या कठिन कलिकाल
कलिकाल महाबीर महाराज महिमेवाने ॥
जगत मै जीते महाबीर महाराजन
ते महाराज बावन हू पातसाह लेवाने ।
पातसाह बावनौ दिली के पातसाह
दिल्लीपति पातसाहै जीत्यो हिन्दुपति सेवाने ॥
अर्थ -
कवी भूषणाच्या मनात शिवभक्तिने ,शिव भक्तिस साधूजनांच्या सेवेने, साधूजनास कलिकालाने,कलिकालास शूर आणि कीर्तिवान राजांनी आणि या शूर आणि कीर्तिवान राजास बावन्न बादशहास जिंकणार्‍या (औरंगजेबाने) आणि त्या बावन्न बादशहाच्या बादशहास म्हणजे दिल्ली पति औरंगजेबास "हिन्दू पति" शिवरायांनी जिंकले.
या छंदात कवि भूषणाने शिवाजी महाराजांना "हिन्दूपति" अशी उपमा दिलेली आहे. यावरूनच पुढील काळात मराठी साम्राज्याला हिंदुपतपातशाही म्हणण्याचा प्रघात पडलेला असावा.
आग्र्याहून सुटका -


चारि चारिचौकी जहाँ चकत्ताकी चहूं और,
साँज अरु भोर लगी रही जिय लेवा की ।

कँधे धरी कांवर, चल्यो जब चाँवसे,
एकलिए एक जात जात चले देवा की ।

भेंस को उतारी डार्‍यो डम्बर निवारी डार्‍यो,
धर्यों भेंस और जब चल्यो साथ मेवा की ।

पौन हो की पंछी हो कि गुटखान कि गौन हो,
देखो कौन भाँति गयो करामात सेवा की ॥


अर्थ -

चारी बाजूला या चुग़ताई वंशाच्या म्हणजेच औरंगजेबाच्या प्राणघातक चौक्या दिवसरात्र लागलेल्या आहेत. कावड खांद्यावर घेऊन एक एक जण मोठ्या डौलाने, अत्यंत आरामात देवाकडे निघालेले आहेत. अशा वेळी त्यांनी (शिवाजी महाराजांनी ) आपला वेष उतरवला, अवडंबर (जे आजारपणाचे अवडंबर माजवलं होतं ते) टाळलं, वेष बदलला आणि मेवा मिठाईच्या त्या पेटार्‍याबरोबर ते निघाले आणि पळून गेले. शिवाजी महाराजांची ही करामत बघून ( आग्र्याचे ) लोक थक्क झाले. त्यांना कळेना की ते (शिवाजी महाराज ) वार्‍याच्या झुळकीसारखे गेले की पक्ष्यासारखे उडून गेले की गुटखा खाऊन एकदम गुप्त झाले. शिवरायांच्या या करामतीला काय म्हणावे हे कोणांस कळेनासे झाले !
छाय रही जितही तितही अतिहि छबि छीरधि रंग करारी ।
भूषन सुद्ध सुधान के सौधनि सोधति सी धरि ओप उज्जारी ।
योंतम तोमहि चाबिकै चंद चहूं दिसी चाँदनि चारू पसारी ।
ज्यों अफजल्लहि मारि महीपर, कीरति श्री सिवराज बगारी ॥

अर्थ -

ज्या प्रमाणे क्षीर समुद्रात जिकडे दृष्टी फेकावी तिकडे शुभ्रच शुभ्र छबि पसरलेली दिसते किंवा चंद्राने अंधकारास ग्रासून शुभ्र चांदणे पसरावे व त्या प्रकाशात शुभ्र चुने गच्ची प्रासादांची जशी सुंदर शोभा दिसावी त्या प्रमाणे शिवाजी महाराजांनी अफजलखानास मारून पृथ्वीवर आपली उज्वल कीर्ति पसरवली.
चढत तुरंग चतुरंग साजि सिवराज ।
चढत प्रतापदिन दिन अति अंग मै ॥
भूषन चढत मरहट्टन के चित्त चाव ।
खग्ग खुलि चढत है अरिन के अंग मै ॥

भोसिलाके हाथ गढ कोट है चढत अरि ।
जोट है चढत एक मेरू गिरिसृंग मै ॥
तुरकान गन व्योमयान है चढत बिनु ।
मान है चढत बदरंग अवरंग मै ॥

अर्थ :-

चतुरंग सैन्य सज्ज करून शिवराज घोड्यावर स्वार होतांच त्यांचा प्रताप दिवसेंदिवस (समरांगणात) वाढतो आहे. भूषण म्हणतो, (इकडे) मराठ्यांच्या मनात उत्साह वाढू लागतो, (तो तिकडे) उपसलेल्या तरवारी शत्रूच्या छातीत घुसत आहेत. भोसल्यांच्या हाती (एका मागून एक) किल्ले येऊ लागले (वाढू लागले) तर तिकडे शत्रूंच्या टोळ्या एकत्र होऊन मेरूपर्वताच्या शिखरावर चढू लागल्या. तुर्कांचे समुदाय (युद्धात मरण मिळाल्यामुळे) विमानात बसून आकाशमार्गे जात आहेत (तो इकडे) अवमान झाल्यामुळे अवरंगजेब निस्तेज होत आहे.
सुनो नवरंगजेब....


किबले की ठौर बाप बादसाह साहजहाँ,
ताको कैद कियो मानो मक्के आगि लाई है ।

बडो भाई दारा वाको पकरि कै कैद कियो,
मेहरहू नाहि माँ को जायो सगो भाई है ।

बंधु तो मुरादबक्स बादि चूक करिबे को,
बीच ले कुरान खुदा की कसम खाई है ।

भूषन सुकवि कहै सुनो नवरंगजेब,
एते काम कीन्हे तेऊ पातसाही पाई है ॥

अर्थ :-

भूषण म्हणतो :- औरंगजेब ! ऐक. तू तुझ्या तीर्थासमान पूज्य असलेल्या आपल्या बापास शहाजनास कैद केले, हे तुमचे कृत्य परमपवित्र अशा मक्केस आग लावण्याइतकेच अनुचित आहे. एकाच आईच्या पोटी जन्मलेला, त्यातून वडिल बंधू जो दारा, त्यालाही पकडून कैदेत घातले. (यावरून मला वाटते) तुझ्या अंतःकरणात दयेचा लवलेश नाही; दुसरा भाऊ मुरादबक्ष याशी कपटाचरण न केल्याबद्दल कुराण घेऊन खुदाची खोटीच शप्पत घेतली. अशी ही कृत्ये केली म्हणून तर तुला बादशाही (राज्य) मिळाली आहे.
हात तसबीह लिए प्रात उठै बंदगी को


हात तसबीह लिए प्रात उठै बंदगी को,
आपही कपट रूप कपटसु जपके ।

आगरे में जाय दारा चौक में चुनाय लीन्हो,
छत्रहूँ छिनायो मानो मरे बूढे बाप के ।

कीन्हो है सगोत घात सो मै नाही कहौ फेरि,
पील पै तोरायो चार चुगुल के गप के ।

भूषन भनत छर छन्दी मतिमंद महा ,
सौ सौ चूहे खाय के बिलारी बैठी तप के ॥

अर्थ -

भूषण म्हणतो, हे औरंगजेब ! तुम्ही रोज सकाळीच उठून हातात स्मरणी घेउन ईश्वर प्राथना करता, पण हे सर्व ढोंग आहे, तुम्ही प्रत्यक्ष कपट रूपच आहात. कारण आग्र्यास जाउन आपल्या सख्या भावास - दारास तुम्ही चौकात जिवंत चिणले; जिवंत व वृद्ध बापास मृत समजुन त्याचे राजछत्र हिसकावून घेतले (व स्वतः राज्य करू लागला) ; मी आता अधिक सांगत नाही. आपल्याच गोत्रजांना चहाडखोर दुतांच्या नुसत्या चहाडयांवरुन हत्तीच्या पायाखाली तुडवून मारविले. तुम्ही मोठे धूर्त आहात ; धर्म शील आहोत असे दाखवता पण तुमच हे कपट शेकडो उंदीर खाऊन तपश्चर्या करणार्‍या मांजरा सारखेच आहे .

"वरील दोन छंदात कवीने औरंगजेबाचा ढोंगी स्वभाव व त्याची भयंकर कृत्ये वर्णन केलेली आहेत. भूषणाने जे छंद औरंगजेबाचे अभय घेऊन मग त्यास ऐकविले अशी आख्यायिका आहे."
दूरजन दार भजि भजि बेसम्हार चढी,
उत्तर पहार डरि सिवाजी नरिंन्द ते ।

भूषन भनत बिन भूषन बसन साधे,
भूखन पियासन है नाहन को निंन्दते ।

बालक अयाने बाट बीचही बिलाने कुम्हिलाने,
मुख कोमल अमल अरविंन्द ते ।

द्दगजल कज्जल कलित बढ्यो कढ्यो मानो,
दूजा सोत तरनि तनूजा को कलिन्द ते ॥


अर्थ -

भूषण म्हणतो, त्या नरवीर शिवरायांच्या भीतीने शत्रु स्त्रिया आपली वस्त्रे, भूषणे टाकून उपाशी तापाशी नवर्‍यांच्या निंदा करीत अनिवारपणे धावून उत्तरे कडील पहाडांवर, पर्वतांवर चढू लागल्या आहेत. अज्ञान बालकांची निर्मल कमलांप्रमाणे असलेली कोमल मुखे कोमेजुन गेली.मूले वाट चुकून भलतीकडेच निघून गेली. त्यामुळे त्यांच्या मातांच्या काजळ घातलेल्या डोळ्यातून अश्रूंचा जो प्रवाह सुरु झा तो कालिंद पर्वतापासून निघालेल्या यमुनेचाच दूसरा ओघ आहे की काय असे वाटायला लागले आहे.
तेग बल सिवराज देव राखे.......

वेद राखे विदित पुरान राखे सार युत राम नाम राख्यो अति रसना सुघरमे ।
हिन्दुनकी चोटी रोटी राखी है सिपाहिन की काँधे में जनेऊ राख्यो माला राखी गर में ।
मिडि राखी मुग़ल मरोरि राखे पातसाह बैरी पीसि राखे बरदान राख्यो कर में ।
राजन की हद्द राखी,तेग बल सिवराज देव राखे देवल स्वधर्म राख्यो घर में ॥
अर्थ :-
शिवरायांनी आपल्या तरवारीच्या जोरावर वेद आणि पुराणे यांचे संरक्षण केले, सर्वस्वाचे सार असे जे रामनाम ते हिंदूंच्या जिव्हेवर कायम ठेवले. हिंदूंची शेंडी राखली आणी शिपायांची रोटी (उपजिविका) चालवली. खांद्यावरील जानवी आणी गळ्यातील माळा सुरक्षीत ठेविल्या. मोगलांचे यथास्थित मर्दन केले. बादशहास मुरगाळून टाकले. शत्रूचे चूर्ण केले. इतके करून आपल्या हाती वर देण्याचा अधिकार ठेवला. देवळात देव व घरात कुलधर्म, कुलाचार कायम ठेवले.

No comments:

Post a Comment