UPCOMING EVENTS


Upcoming Events (Lectures on):

  • HISTORY WEEK FEBRUARY 2012


  • History Week 2012
  •   lecturers:30th Jan-श्री.कुमार केतकर_Pandit Neharu, 31st Jan श्री.सुरेश द्वादशीवार_Mahatma Gandhi,
  • 1st Feb श्री.राजू परुळेकर_Dr. Babasaheb Ambedkar,
  • 2nd Feb_श्री.अजित अभ्यंकर_Marx , 3rd Feb_श्री.विश्वंभर चौधरी _RSS

Thursday, February 24, 2011

सेक्युलारिझम – १


“आचार्य नरहर कुरुंदकर” यांच्या “जागर” या लेख संग्रहातून साभार..

मूळ लेखाचे शीर्षक: सेक्युलारिझम आणि इस्लाम

*************************************************************

“Secularism” हा इंग्रजी शब्द मी मुद्दामच भाषांतरित न करता स्वीकारलेला आहे. अधर्मी, निधर्मी, धर्मातीत या शब्दांनी तर “Secularism” या शब्दातील मूळ कल्पना स्पष्ट होताच नाही, पण इह्लोकवादी किंवा इह्लौकिक या शब्दांनीही नीटसा अर्थबोध न होता गोंधळच माजण्याचा संभव आहे. विशेषतः “Secularism” या शब्दालाही दीर्घ इतिहास असल्यामुळे व त्याही कल्पनेचा इतिहासक्रमात विकास होत आल्यामुळे तो शब्द तसाच ठेवणे इष्ट वाटते. अधर्मी, निधर्मी यांसारख्या शब्दप्रयोगांनी राज्यसंस्था स्वतःचा असा कोणताही अधिकृत धर्म मानणार नाही, इतकाच बोध होतो.राज्यसंस्थेने स्वतःचा धर्म म्हणून कोणताही धर्म घोषित केला नाही, तरी समाजजीवनात धर्माचे स्थान राहणारच. हा धर्म व्यक्तीच्या मनावर आपले प्रभुत्व गाजवितच राहणार. राज्यसंस्था या धर्मप्रभावाकडे दुर्लक्ष करणार कि काय, असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो आणि इह्लोकवादी राज्यसंस्था असे म्हणतानाच सरकार परलोकावर श्रद्धा ठेवण्यास मनाई करणार कि काय, असेही वाटू लागते. इतर सर्व तपशीलात न जाता Secularism ची माझ्या समोरची मुख्य कल्पना “धर्म ही फक्त पारलौकिक प्रश्नांचा विचार करणारी संस्था आहे,” या एक मुद्यातून निष्पन्न होणारी आहे. जगातील एकाही धर्माला धर्माची ही व्याख्या पटणार नाही. किंबहुना, धर्माची ही सर्वात धर्मद्रोही व्याख्या आहे, यावर सर्वांचे एकमत होईल!!

कोणताही धर्म स्वतःला निव्वळ पारलौकिक मानीत नाही. किंवा खऱ्या अर्थाने पहायचे तर कोणताही धर्म अंतिमतः इहलोक आणि परलोक ही विभागणी मान्य करत नाही. भारतातील हिंदू विचारवंत धर्माचा विचार पुष्कळदा पारलौकिक, पारमार्थिक परिभाषेत विचार मांडण्याचा प्रयत्न करतात ; पण हे हिंदु धर्माने घेतलेले वर्तमानकाळातील जाहीर सभेपुरते मर्यादित असलेले सोज्वळ रूप आहे ; सत्य नव्हे. इस्लाम तर इहलोक आणि परलोक , धार्मिक जीवन आणि सामाजिक जीवन अशी विभागणी अजिबात मान्य करत नाही.प्रत्येक धर्माने आपल्या अनुयायांसाठी काही श्रद्धा ,चालीरीती निर्माण करून ठेवल्या आहेत. त्यांचा आधार सुटला, तर सगळे धर्म एकदम हवेत तरंगू लागतील, – निष्प्रभ होतील. धर्म ज्यावेळी इहलोकाची कक्षा आपल्या कक्षेतून सोडून देतो, त्यावेळी एक सामाजिक सत्य म्हणून किंवा समाजघटना म्हणून धर्माचा विचार करायची गरज संपते. ज्या दिवशी धर्म केवळ पारलौकिक बाबींपुरता मर्यादित राहील तेव्हा धर्म इहालोकाविषयी काही सांगू शकणार नाही. गाय हे इहलोकातील जनावर, चे मांस खाणारे इहलोकातील काही मानव. गाय मारणे, तिचे मांस खाणे या सगळ्या क्रिया इहलोकातील. धर्माची कक्षा पारलौकिक आहे, हे जर खरे असेल, तर गाय पवित्र आहे हेहे धर्म सांगू शकत नाही!! गाय भक्ष्य कि अभक्ष आहे हेही सांगू शकणार नाही. हिंदू धर्मातील कोणताही पंडित ही परिस्थितीत स्वीकारार्ह समजणार नाही.

धर्मश्रद्ध लोक ज्यावेळी धर्म ही पारलौकिक बाब आहे, असे म्हणतात, त्या वेळी त्या वाक्याचा आशय अगदी निराळा असतो. इहलोकात काय पुण्य मानावे, काय पाप मानावे , काय धर्म्य मानावे, समर्थनीय मानावे यावर विचार करण्याचा अधिकार इहालौकीक जीवन जगणाऱ्यांचा नसून याबाबत परलोकातून आलेले निर्णय हेच फक्त स्वीकारार्ह आहेत, असे धर्मिकाना म्हणायचे असते. सगळ्या समाजजीवनालाच धर्माची मान्यता असते. न्याय, पाप, पुण्य, धर्माने आखून दिलेले असते. व्याजी दिलेल्या रकमेची एक वर्षात व्याजासकट दीडपट होणे रास्त आहे, असे धर्माचे म्हणणे असते. म्हणून तर मानू व्याजाचे दरसुद्धा ठरवून देतो. हिंदू समाजातील सगळी जातीव्यवस्था धर्माच्या मान्यतेने उभी आहे. हिंदू धर्म काय किंवा मुसलमान धर्म काय, तत्वतः कुठलाच धर्म पारलौकीक नसतो. परलोकाच्या नावे चालणारा इहलोकाचा सार्वजनिक व्यवहार ही धर्मच मुख्य कक्षा असते. समाजजीवनाच्या सार्वजनिक कक्षेतून धर्म बाजूला सारणे आणि तो केवळ पारलौकीक बाबींसाठी मर्यादित ठेवणे, हा मी Secularismचा मुख्य अर्थ मानतो, ते यासाठीच.

‘पारलौकिक बाब’ हा वाटतो तितका साधा नाही. बोराच्या आळीत तक्षक लपला असावा, त्याप्रमाणे या एका सूत्रात धर्माचा सारा विषारीपणा लपलेला असतो. मेल्यानंतर जीवात्म्याचे व्हायचे, किंवा काय व्हावे, हा प्रश्न वाटतो तितका साधा नाही. कारण मृत्युनंतर जीव देहाबंधानातून मुक्त होतो, इहलोकी केलेल्या पाप-पुण्यातून नाही. मृत्युनंतर परलोकी जीवाला जे फळ मिळायचे ते इह्लोकीच्या कर्मानुसार असते. म्हणून इहलोकात कर्तव्यविधि काय, अकर्तव्यनिषेध काय हे धर्म सांगून टाकतो. जानवे तुटले असताना जेवणारा ब्राह्मण पाप करतो. हे त्याचे पाप त्याला मृत्युनंतर फेडावे लागते. धर्म ही केवळ पारलौकीक बाब आहे, या वाक्याचा खरा अर्थ समाजाच्या धारणेची मूल्ये देण्याचा अधिकारसुद्धा धर्माचा नाही, हा आहे. कारण व्यभिचारी पती सहन करावा कि सोडावा, याचा निर्णय जोवर धर्म देणार असेल तोवर तो धर्म मूल्यांच्या दडपणाने स्त्रियांची गुलामी चालू ठेवणार आहे. समाजातील सर्वाजनिक जीवन तर सोडाच, पण व्यक्तीचे मानसिक जीवन हेही इहालौकीक असते. देशद्रोह करणारा पती गोळी घालून ठार मारणे म्हणजे पाप , या पतीहत्येच्या पापामुळे अनंतकाळ रौरव नरकात यातना भोगाव्या लागतील, अशी समजूत समाजामध्ये जर बळकट राहिली, तर मग राष्ट्रावाद्सुद्धा धोक्यात येईल.

वरील उदाहरणे एकांतिक आहेत, अतिरेकी आहेत, अपवादात्मक आहेत हे मीच मान्य करून टाकतो. पण ती उदाहरणे फक्त मुद्दा समजण्यापुरती आहेत. धर्माने सरंजामशाही च्या कळत स्वीकारलेली, पुरस्कारलेली समाजरचना आणि जीवनमूल्ये या दोन्हींचाही ठसा समाजाच्या मनावरून शक्य तितक्या लवकर पुसून काढावा ही Secularismची प्रक्रिया आहे. म्हणून मी या शब्दाची व्याख्या धर्म पारलौकिक बाबींपुरता मर्यादित करणे अशी करतो आणि ज्यावेळी मी पारलौकी हा शब्द वापरतो त्यावेळी माझ्या डोळ्यासमोर फक्त काही अध्यात्मिक श्रद्धा इतकेच आहे. Secularism ची ही व्याख्या म्हणजे सरळसरळ धर्माविरुद्ध बंड आहे हे मी मान्य करतो. कारण Secularism ही कल्पनाच मुळी धर्माविरुद्धच्या बंडातून क्रमाने विकसित होत आलेली आहे.

आजच्या राजकारणात नेहेमी Secularism चा विचार अल्पसंख्यांकांच्या हितरक्षणाच्या संदर्भात होतो, हीच मुळात पहिली चूक आहे, Secular राज्यव्यवस्थेत अल्पसंख्यांकाच्या जीविताचे व हिताचे संरक्षण होत असेल तर ती एक अनुषंगिक बाब आहे। Secularism अल्पसंख्याकांच्या हितासाठी नसतो, तो नेहेमीच बहुसंख्येच्या हितासाठी असतो; ही गोष्टच विसरून जाऊन आपण Secularism चा विचार करू लागलो आहोत.

- Dnyaneshwar Patil,

COEP History Club

No comments:

Post a Comment