UPCOMING EVENTS


Upcoming Events (Lectures on):

  • HISTORY WEEK FEBRUARY 2012


  • History Week 2012
  •   lecturers:30th Jan-श्री.कुमार केतकर_Pandit Neharu, 31st Jan श्री.सुरेश द्वादशीवार_Mahatma Gandhi,
  • 1st Feb श्री.राजू परुळेकर_Dr. Babasaheb Ambedkar,
  • 2nd Feb_श्री.अजित अभ्यंकर_Marx , 3rd Feb_श्री.विश्वंभर चौधरी _RSS

Thursday, February 24, 2011

शिवरायाचे कैसे जेवणे?

Chhatrapati Shree Shivaji Maharaj

छत्रपती श्रीशिवाजीमहाराजांच्या गोष्टी हा अस्मादिकांचा तसा अगदी प्रागैतिहासिक काळापासोनचा अनन्य विसावा आहे. बाजीप्रभू , मुरारबाजी, तानाजी, संभाजी कावजी, बहिर्जी नाईक, या वीरांच्या प्रभावळीत तानाजी हा आमच्या गल्लीतील एका काकांचा ऑल टाईम फेवरीट होता.ते आम्हाला अनेक गोष्टी सांगत. पण तानाजीच्या शौर्याच्या गोष्टी तर ऐकून ऐकून पाठ झाल्या होत्या. मग काय करावे? ते तानाजीच्या भोजनचर्येच्या सुरस आणि चमत्कारिक गोष्टी सांगत असत. ती वर्णने असत भीमाची, परंतु तानाजीच्या नावावर खपवीत. त्यामुळे “तानाजी हाच महाभारतातील भीम” ऐसा एक प्रबंध रेडी करावा असा मानस होता, परंतु गाईड मिळेना, त्यामुळे ते राहिले आणि महाराष्ट्र अजून एका पी. एच. डी. प्रबंधाला मुकला. पण त्या गोष्टी मात्र कायमच्या लक्षात राहिल्या. मग त्यात १०० किमी रपेट करून आल्यावर तानाजीने १०० भाकर्यांचा ऑन द स्पॉट कसा फडशा उडविला, रोजच्या न्याहारीला वीसेक ऑम्लेट्स कशी बनविली जात, रायबाने एकदा “आता बास” म्हटल्यावर तानाजीने त्याला अजून १० भाकर्या कशा खायला लावल्या, शेतावर न्याहारीला बसले असताना लोणच्याची इच्छा झाल्यावर माईनमुळाचे झाडच्या झाड उपटून त्याने कसे “फार्म-फ्रेश” लोणचे खाल्ले, अशा आणि अजून अनेक कथा-उपकथा होत्या. शेवटी बालसुलभ शंका म्हणून मी विचारलेच- ” जर इतक्या भाकर्या आणि भात रोज शिजत होता, तर मोलकरणी किती असतील? त्यासुद्धा फक्त भाकर्या बडवायला?” त्यालाही उत्तर तयार होतेच- जास्ती नाही, पण ज्या होत्या त्यांना स्पेशल आहार, उदा. थंडाई वगैरे दिली जात असे- झीज भरून काढून अंगात दम राहावा म्हणून!

हे खरे की खोटे, याची शहानिशा काही आम्ही तेव्हा केली नाही. पण त्या भानगडीत शिवकालीन खाद्यसंस्कृतीबद्दल कायमचे कुतूहल मनात घर करून बसले. खरंच काय बरे खात असतील हे लोक? हे मावळे आणि महाराज आपल्यासारखे गव्हाच्या चपात्या खात असतील की भाकर्या? भाज्या कोणत्या खात असतील? यापैकी काही प्रश्नांची उत्तरे सोपी आहेत, तर काही माहिती कालौघात गडप झालीये. पण काहीसा धावता आढावा तरी आपण नक्कीच घेऊ शकतो.

सुरुवातीचा मुद्दा म्हणजे १७व्या शतकातील महाराष्ट्रात गहू कितीसा पिकत होता? आत्ता घरोघरी गव्हाच्या चपात्या आपण खातो खर्या, परंतु आत्ताचा गहू म्हणजे मुख्यत: हरितक्रांतीनंतरच्या पंजाबची देणगी आहे. तेव्हा गहू अगदीच पिकत नसे असे नाही, परंतु जनसामान्य सर्रास खातील इतका तरी नक्कीच पिकत नव्हता. आणि बटाटा? मुळात हा प्रकार म्हणजे पोर्तुगीज लोकांची जगाला देणगी आहे. दक्षिण अमेरिकेतून त्यांनी बटाटा आणला आणि जगाला दिला. त्यामुळे कमीत कमी इ.स. १६०० पर्यंत तरी भारतात बटाट्याचे उत्पादन घेतले जात नसे. पहिल्यांदा सुरत येथे बटाट्याचे पीक घेतले गेले आणि तिथून तो सगळीकडे फोफावला. मग मुख्य धान्ये कोणती? ज्वारी, नाचणी , बाजरी. मावळात तरी कमीतकमी यांचीच चलती असे. आणि भात तर होताच. भाताच्या आंबे मोहर ह्या जातीचे नाव मावळातील त्या नावाच्या २ गावांवरून पडले असे मराठी व्युत्पत्ती कोश म्हणतो. पण बासमती तेव्हा कोणी फारसा वापरत नसे- तो वाण महाराष्ट्रातील नाहीच मुळी. घनसाळ, जिरेसाळ इत्यादी भाताचे प्रकार होते. आणि मका जरी १७व्या शतकात भारतात पिकत असला, तरी महाराष्ट्रात नव्हता.

ही झाली मुख्य धान्ये. डाळी कोणत्या होत्या? मसूर, तूर , मूग, चणा, उडीद, हरभरा इत्यादी. या डाळींचा उल्लेख अगदी कौटिल्याच्या अर्थशास्त्रात देखील आढळतो. त्यात त्यांच्या विविध जाती-उपजाति आहेत, असे स्पष्ट विधान आहे. संगम तमिळ साहित्यात तूर डाळीचे काही उल्लेख आहेत. आणि पालेभाज्या म्हणाल तर अंबाडी, तांदळी, पालक इत्यादी या १७ व्या शतकातील महाराष्ट्रात होत्याच. पालकाबद्दल असे म्हटले जाते की इराण मधून अरब व्यापार्यांनी तो भारतात आणला, त्यामुळे कमीतकमी इ.स. १००० नंतर तरी भारतात पालक पिकवला जाऊ लागला हे निर्विवाद.

ही झाली निव्वळ अन्नधान्याची वर्गवारी. पण तेव्हाच्या जेवणात कोणत्या डिशेस होत्या? आत्तासारखी गल्लोगल्ली पंजाबी हॉटेल्स आणि कोल्हापुरी अस्सल मिसळ तेव्हा नसे. इतकेच काय, अगदी १९६०-७० पर्यंत पुण्याच्या शासकीय एन्जिनिअरिन्ग कॉलेजच्या होस्टेल मेस मध्ये कोकणी, देशावरची, सिंधी-पंजाबी आणि एक कॉमन नॉनव्हेज मेस होती. त्यामुळे १७ व्या शतकातील महाराष्ट्रात जेवणात बरीच विविधता होती. त्यात परत असंख्य जातींचे निकष लावले की अजून वैविध्य येते. एकच आमटी , देशावर आणि कोकणात वेगळ्या तऱ्हेने बनत असे, अजूनही बनते. आणि एकाच प्रदेशातील जाती-धर्मानुसार सुद्धा जेवणात फरक पडतो.

तर आता मूळ मुद्द्याकडे येऊ. शिवाजीमहाराज रोजच्या जेवणात काय बरे जेवत असतील? त्यांच्या जेवणात जे जे घटक असण्याची सर्वात जास्त शक्यता होती, त्यांची यादी वर दिलेली आहे . चपाती-भाजी, भात शिवाय काही गोड-धोड पदार्थ असावेत. शिवाय नॉनव्हेज तर क्षत्रिय असल्याने ते खात असावेतच. पण त्यात देखील कोणते नॉनव्हेज? चिकन? मटन? मासे? देशावर जास्त काळ वास्तव्य असल्याने मासे हा प्रकार कधीतरी कोकण प्रांतात गेल्यावरच जास्त करून होत असावा. त्यामुळे उरले चिकन आणि मटन हे दोन पर्याय. महाराजांची जीवनशैली पहिली, तर एक गोष्ट लक्षात येते, की त्यांनी आयुष्यभर धावपळ, दगदग केली. स्वस्थता अशी फारशी लाभलीच नाही. त्यामुळे जाड्य, मांद्य आणणारे मटन सारखे नॉनव्हेज ते सर्रास खात असतील का, अशी शंका येते. त्यामुळे जास्त शक्यता वाटते ती चिकनचीच. दुर्गभ्रमणगाथेत गोनीदांनी एक उल्लेख उद्धृत केला आहे( मूळ तो कदाचित नरहर कुरुंदकरांचा असावा- स्मरण पुसट आहे), की महाराज चिकन खात असावेत. उत्तरेत गेल्यावर पुलाव, तंदुरी इत्यादी गोष्टींचा आस्वाद त्यांनी नक्कीच घेतला असेल. पण गोवळकोंड्याला त्यांनी बिर्याणी खाल्ली होती का? नसावी, कारण हैदराबादी बिर्याणी हा प्रकारच मुळात निजामाच्या काळात विकसित झाला, १८ व्या शतकात. बंगळूरला गेल्यावर इडली-डोसा, तर वेल्लोरला गेल्यावर रसम इत्यादी पदार्थ त्यांनी खाल्ले असावेत. शिवाय ते खिचडी खात असत. आता म्हणाल यात काय विशेष? विशेष आहे तो म्हणजे खिचडीचा केलेला उल्लेख. राज्याभिषेक जेव्हा झाला, तेव्हा हेन्री ऑक्झेण्डन हा इंग्रज वकील रायगडावर हजर होता.त्याने लिहून ठेवले आहे, की मराठे डाळ-तांदळात लोणी घालून खातात! त्याला तरी काय माहिती म्हणा मुगाची खिचडी! [बाकी खाण्याच्या बाबतीत म्हणाल तर मोगलाई आणि पेशवाई जास्त इंटरेस्टिंग आहेत, पण त्यांपैकी प्रत्येकाचा परामर्श घ्यायचा तर स्वतंत्र पुस्तकच हवे. असो.] आणि प्रसंगवशात काजू-पिस्ते तर नक्कीच खात असतील. पापड-सांडगे देखील रायगडावर केले जात असावेतच. पण तत्कालीन पदार्थांबद्दल एतद्देशीय साधने पहिली तर ब्राह्मणी जेवणाचे डीटेल वर्णन समर्थ रामदासांच्या एका रचनेत आहे. त्यावरून काहीसा अंदाज बांधता येतो.

[जाता जाता :"Shivaji's visit to Aurangzeb at Agra" या जदुनाथ सरकारांनी संपादित केलेल्या राजस्थानी पत्रसंग्रहात शिवाजीमहाराज दिसायला कसे होते , याचा उल्लेख आला आहे. अस्सल पत्रातील वाक्यांचे सरकारांनी इंग्रजी भाषांतर केले आहे तेच खाली देतो:
" At first sight, Shivaji's body looks lean and short, but he is wonderfully fair in complexion, and even without knowing who he is, one does feel that he is a ruler of men. His spirit and manliness are apparent from his demeanor. He wears a beard."
अजूनही बरेच वर्णन पुढे आहे, पण त्यातील मुख्य महत्वाचा भाग वर दिला आहे. वरील वर्णनावरून असे दिसून येते, की महाराज उंचेपुरे म्हणावे असे नव्हते. आणि त्यांची अंगकाठीही जराशी बारीकच होती. पण हे वर्णन आहे इ.स. १६६६ चे- महाराज तेव्हा ऐन छत्तिशीत होते आणि तो काळ सर्वात धामधुमीचा होता. पुढे १६७० नंतर जराशी स्वस्थता लाभल्यानंतर मात्र महाराजांचे वजन बर्यापैकी वाढले. याला पुरावा म्हणजे त्यांच्या राज्याभिषेकावेळी जी सुवर्णतुला झाली, तिला हजर असलेल्या एका इंग्रजाने नमूद केले आहे, की महाराजांचे वजन सुमारे ७०-८० किलो असावे.हा अंदाज अर्थात मोहोरांच्या संख्येवरून आणि एका मोहोरेच्या साधारण वजनावरून केला गेलेला आहे. असो.]

-निखिल बेल्लारीकर,

COEP HISTORY CLUB

No comments:

Post a Comment